पुणे : टॉप पब्लिक न्यूज -
अवैध धंदे करणार्यांना 7 पिढ्या लक्षात राहील अशी कारवाई करु ! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा नव्या वर्षात गुन्हेगारांना पुन्हा सज्जड दम..
पुणे : टॉप पब्लिक न्यूज -: ज्यांना मस्ती आली असेल, बेकायदेशीर धंदे करुन पैसे कमवत असतील, गँग चालवून खंडणी मागणारे, बळाच्या जोरावर जमीन, घरे खाली करायला लावणार्या संघटीत टोळक्यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी नव्या वर्षात पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. तुम्ही कुठलेही अवैध धंदे करत असाल तर शहर सोडून निघून जा. सापडला तर तुमच्या ७ पिढ्यांना आठवण राहिल अशी कठोर कारवाई करु, अशा शब्दात गुन्हेगारांना इशारा दिला आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यानंतर शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुख गुन्हेगारांना बोलावून त्यांना दम दिला होता. त्यानंतर वानवडी येथील मुद्देमाल वितरण कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहानिमित्ताने परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील ९ पोलीस ठाण्यांकडील ८० गुन्ह्यांमधील १ कोटी ७६ लाख ६७ हजार ३०२ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते परत करण्यात आला. त्यात दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम यांचा समावेश होता. यावेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्याचा कार्यक्रम घेतला. परिमंडळ ५ प्रमाणे इतरांनी त्यांच्याकडील मुद्देमाल नागरिकांना परत करावा. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे व गुन्ह्यांचा शोध लावण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. तुम्हाला आपल्या आजू बाजूला कोठे गैर कृत्य, अवैध धंदे सुरु असताना दिसत असेल तर तुम्ही आम्हाला फोन करा, पोलीस स्टेशनला किंवा ११२ वर फोन करुन कळवा, आम्ही नक्की कारवाई करु. विश्वास ठेवा, एकदा, दोनदा, किती वेळा फोन केले आम्ही तेथे वारंवार कारवाई करु, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळालेल्या काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काही महिलांना गहिवरुन आले चोरीला गेलेली वस्तू पुन्हा मिळणार नाही असे लोक सांगत असतानाच पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्या परत केल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांना धन्यवाद दिले.
टाॅप पब्लिक न्यूज-संपाद सौ.प्रतिभाताई पाटील