चाकण : भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त आज सायंकाळी ७ वाजता भैरवनाथ महाराज मंदिर येथे ह.भ.प.अशोक महाराज जाधव यांची कीर्तन सेवा होणार असुन. उद्या सकाळी नऊ वाजता ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच उद्या दि.१५ रोजी महात्मा फुले चौक येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत बैलगाडयांचे टोकन स्वीकारले जाणार आहे.
दिनांक १६ व १७ रोजी बैलगाडा शर्यतिचे आयोजन करण्यात आले आहे. आठ वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चाकण मध्ये बैलगाडा शर्यत प्रथमच होणार असून या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात्रेमध्ये पुणे जिल्ह्यातून नामांकित बैलगाडा मालक व बैलगाडा शोकिन उपस्थित रहाणार आहे. चाकण यात्रा कमिटीने सुसज्य बैलगाडा घाट तयार केला असुन अलांउसर व सर्व प्रमुख मान्यवरांसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
तसेच घाटाच्या दोन्ही बाजूने साऊंड सिस्टिम साठी दहा टॉवर उभारण्यात आलेले असुन बैलाचे उन्हाच्या कडाख्यापासून संरक्षण होण्यासाठी छावण्या उभारण्यात आल्या आहेत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन्ही दिवस पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी बैलांच्या देखभालीसाठी उपस्थित राहणार आहे.
शर्यतीसाठी रोख रक्कम ४६६००० हजार रुपये असून दिनांक १६ व १७ प्रत्येक दिवस फायनल क्रमांक १ साठी बुलेट गाडी, फायनल नंबर २ साठी हिरो स्प्लेंडर गाडी व फायनल क्रमांक ३ साठी हिरो सी. डी. डीलक्स गाडी तसेच घाटाचा राजा मानकरी साठी चांदीची गदा ठेवण्यात आली आहे. व इतर आकर्षक वस्तू रुपी बक्षिसे देण्यात येणार आहे.
दिनांक १६ सकाळी हारतुरे, मांडव-डहाळे, गुलाल-भंडारा उधळण छबिना-पालखी मिरवणूक होणार असून सायंकाळी रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ रोजी सायंकाळी ७ वाजता बारा गावच्या बारा अप्सरा हा धमाल आर्केस्ट्रा चाकण नगरपरिषदेचे समोर ठेवण्यात आला आहे. दिनांक १८ रोजी सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.
बैलगाडा शर्यती मध्ये ४०० ते ४५० पर्यंत बैलगाडे धावतील अशी माहिती चाकण ग्रामपंचायत चे मा. सरपंच अशोक शेठ बिरदवडे, चाकण ग्रामीण सह पतसंस्थेचे मा. चेअरमन नवनाथ शेवकरी, चाकण विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक बाबाजी राक्षे व फायनल सम्राट विकास नायकवडी यांनी दिली असून यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन चाकण व पंचक्रोशीतील नागरिकांना यात्रा कमिटीचे अध्यक्ष किसन सोपाना गोरे व सचिव व्यंकटेश उर्फ तात्या सोरटे यांनी केले आहे.