top Public News
*"सोहळा स्वराज्याचा"*
दि.29 रोजी स्थानिक स्प्रिंगडेल शाळेचा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदाच्या कार्यक्रमाची
संकल्पना होती *सोहळा स्वराज्याचा*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०व्या वर्षाचे औचित्य साधून ही संकल्पना ठेवली होती.
सर्वप्रथम विज्ञान व रोबोटिक प्रदर्शन तसेच रोबोटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री .योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम स्वागतनृत्य सादर केले.
सत्यम् एज्युकेशन सोसायटीच्या कोषाध्यक्षा सौ शुभांगी मेंढे यांनी शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
सत्यम् एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सौ.कांचन अनंत आष्टीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख बक्षिसे व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शालेय परीक्षेत प्रत्येक इयत्तेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. योगेश कुंभेजकर यांनी आजच्या तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी पुरेपूर करावा व पालकांनी त्याकडे लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगून शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे असे विशद केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या नृत्याने झाली. या सां सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिधी सोनकुसरे ,अर्निका गजघाटे अवनीश कुमार, मानिनी धैर्या,मनस्वी पाल, ऋग्वेद शेंडे, संस्कृती शिल्लारे आयुष बुराडे ,अदिती पांडे , ओजस्वी कहालकर यांनी केले.
शाळेच्या समन्वयीका सौ.ज्योती शाहू यांनी शाळेचा अहवाल सादर केला.
त्यानंतर खेळांवर आधारित सुंदर नृत्य निरनिराळे मनोरे रचून सादर करण्यात आले.
त्यानंतर शाळेचे संगीत शिक्षक श्री. विनोद बोरकर यांनी रचलेला व बसवलेला शिवाजी महाराजांचे गुणवर्णन करणारा पोवाडा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व उत्साहपूर्ण रीतीने सादर केला. संपूर्ण वातावरण जणू वीरश्रीने भरून गेले होते.
अशाच वीरश्रीयुक्त वातावरणात सुरू झाला बहुप्रतिक्षित कार्यक्रम *"सोहळा स्वराज्याचा"!*
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या महाराष्ट्राने झाली. आदिलशहा, निजामशहा मोगल यांनी केलेले अत्याचार पाहताना जिजाऊंची होणारी तडफड, शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांना मिळालेले संस्कार व शिक्षण, रायरेश्वराची शपथ ,तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणे, अफजलखानाचा वध, कोंढाणा गड सर करणे इत्यादी प्रसंग सादर केल्या नंतर सर्वात शेवटी महाराजांचा *राज्याभिषेक सोहळा* अतिशय दिमाखदारपणे सादर केला गेला. पूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांना क्षणोक्षणी रोमांचित करणारा होता.
पूर्ण सोहळ्याचे दिग्दर्शन श्री .विक्रम फडके व नृत्य संयोजन श्री. पवन डुंबरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी राघौर्ते, पूर्वा हटवार, श्रावणी पाटील, रसिका उमाळकर या दहावीच्या विद्यार्थीनींनी केले. आभार प्रदर्शन शर्वरी सेलोटे हिने केले.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर यांच्याबरोबर सत्यम् एज्युकेशन सोसायटीच्या कोषाध्यक्षा सौ. शुभांगी मेंढे, संचालक श्री अनंत आष्टीकर, संचालिका सौ.कांचन आष्टीकर, संचालक श्री विनय अंबुलकर, संचालक श्री अजित आष्टीकर,सौ. सुरभी अंबुलकर तसेच शाळेच्या माजी प्राचार्या सौ.अनघा पदवाड, विद्यमान प्राचार्या शेफाली पाल, प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर, प्री प्रायमरी प्रमुख सौ.कल्पना जांगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाला पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सर्व कार्यक्रमाची सजावट जणू शिवकाळात घेऊन जाणारी होती. स्वराज्य सोहळ्याचे प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची मोठी व देखणी प्रतिकृती उभारली होती.
टाॅप पब्लिक न्युज कावेरी देशमुख