टॉप पब्लिक न्यूज - पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं मध्यरात्री दीडच्या सुमारास एक तरुण बाईकवर महिलेचा मृतदेह घेऊन फिरत होता. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला हटकलं. त्याची विचारपूस केली असता पुण्याला हादरवणारं हत्याकांड समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
राकेश रामनायक निसार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मध्यरात्री दीड वाजता आरोपी राकेश एका महिलेचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, संबंधित मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नव्हे तर त्याच्याच पत्नीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. बबीता राकेश निसार असं मयत पत्नीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा आरोपी राकेश याने पत्नी बबीताची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क दुचाकीवरून प्रवास करत होता. तो पत्नीचा मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला बेड्या ठोकल्या.
मध्यरात्री दीड वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपीनं पत्नीची हत्या नेमकी का केली? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. मात्र पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात अशाप्रकारे तरुण दुचाकीवर बायकोचा मृतदेह घेऊन फिरत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर - : प्रशांत