टॉप पब्लिक न्यूज -: पावस येथील रनपार किनाऱ्याजवळ समुद्रामध्ये मौजमजा करण्यासाठी गेलेल्या १६ जणांची बोट अचानक उलटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी घडली. बोटीमध्ये अचानक बिघाड झाल्याने आणि समुद्र खवळलेला असताना या बोटीने नियंत्रण गमावले आणि पलटी झाली. काही क्षणांतच बोटीतले सर्व जण पाण्यात बुडू लागले. मात्र, पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आणि सर्वांना सुखरूप वाचविण्यात यश आले.
सुदैवाने ही घटना घडली तेव्हा रत्नागिरी पोलिस दलाने किनारपट्टी सुरक्षा मोहिमे ‘सागर कवच’ची तयारी सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान पोलिस पथक समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित असल्याने त्यांनी तातडीने परिस्थिती ओळखून बचाव कार्य सुरू केले. बोटीतील सर्व वाचलेले लोक पाण्यात जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना, पोलिस पथकाने वेळ वाया न घालवता मदतीचा हात पुढे केला.
दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी धाडस, जलद निर्णयक्षमता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत बुडणाऱ्या सर्व १६ जणांना सुरक्षितपणे वाचवले. त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि सर्वजण सुखरूप असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. स्थानिकांनी पोलिस दलाच्या जलद प्रतिसाद आणि शौर्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: सौ प्रतिभा ताई पाटील