टॉप पब्लिक न्यूज -: मागील काही दिवसात पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम Guillain-Barre Syndrome (GBS) रुग्णांची संख्या वाढली असून आता राज्यातील एकुण रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे. या संदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत पुणेकरांना महत्वाचे आवाहन केले आहे.
पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार केले जात आहेत. सध्या नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसले तरी रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांमध्ये घबराट पसरण्याची भीती लक्षात घेऊन पालिका आयुक्तांनी ताजी माहिती दिली, तसेच बाधा टाळण्यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या गरीब रुग्णांवर पालिकेकडून मोफत उपचार केले जात आहेत.
पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी म्हटले की, बाधितांची संख्या वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पाण्याचे काही नमुने आम्ही तपासले आहेत. पण त्यात जीबीएस विषाणू आढळले नाहीत. तरीही आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी उकळलेले पाणीच प्यावे. सध्याच्या परिस्थितीत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.
डॉ. राजेंद्र भोसले यांनी माहिती देताना म्हटले की, आरोग्य विभागाच्या शीघ्र प्रतिसाद पथकाने रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागांची पाहणी सुरू केली आहे. रुग्णांचे शौच नमुने आणि रक्तनमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविण्यात येत आहेत. यातील काही रुग्णांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले असून, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरा व्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे.
ते पुढे म्हणाले की, पुण्यातील विविध भागांतील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अद्याप तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.
आयुक्तांनी माहिती देताना म्हटले की, राज्यातील एकुण जीबीएस रूग्णांची संख्या 101 झाली आहे. यामध्ये 68 पुरुष तर 33 महिलांचा समावेश आहे. पुणे पालिकेने जवळपास 25 हजार 578 घरांचे सर्वेक्षण केले आहे. पुणे पालिका हद्दीत जीबीएसचे 64 रुग्ण आहेत. त्यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 5 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आयुक्तांनी माहिती देताना म्हटले की, पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 15 आयसीयू बेड जीबीएस बाधित रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवले आहेत. येथे जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत