टॉप पब्लिक न्यूज -: बाजारभावापेक्षा अधिक दर महा दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांनी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठेव योजनांद्वारे कोट्यावधी रुपये घेतले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ते पैसे परत करत नसल्याच्या तक्रारी पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणुकदारांकडून करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत किमान 50 कोटी रुपयांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु, गेल्या काही महिने त्यावर पोलिसांकडून केवळ तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमका काय तपास सुरु आहे हे गुलदस्त्यातच आहे.
या तक्रारीबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ (DCP Vivek Masal) यांनी सांगितले की, अमित लुंकड यांच्याविरुद्ध यापूर्वी तक्रारी आल्या होत्या. त्यातील काही जणांनी नंतर तक्रारी मागे घेतल्या आहेत. आता नव्याने पुन्हा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्या सर्व एकत्र करुन त्याचा तपास करण्यात येत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये गुंतवणूकदारांनी अमित कांतीलाल लुंकड (Amit Kantilal Lunkad), अमोल कांतीलाल लुंकड (Amol Kantilal Lunkad) आणि पुष्पा कांतीलाल लुंकड (Pushpa Kantilal Lunkad) यांना प्रतिवादी केले आहे. याबाबत प्रविणचंद जैन यांनी सर्वप्रथम तक्रार दिली होती. लुंकड यांनी त्यांचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या ठेव व गुंतवणुक योजनाबाबत आश्वासित केले.
अमित आणि अमोल लुंकड यांनी दरमहा दीड टक्का आणि सध्या मार्केटमध्ये असलेल्या दरापेक्षा अधिक परतावा देऊ, असे आश्वासन दिले. नियमित व्याज देऊ असे आश्वासित केले. त्यानंतर लुंकड रियाल्टीमध्ये प्रविणचंद जैन यांनी 6 कोटी 81 लाख रुपयांची गुंतवणुक केली. सुरुवातीला त्यांच्याकडून व्याज येत होते. परंतु, 2019 पासून व्याज देण्यास अनियमितता होऊ लागली. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत अपुरा निधी असल्याचे कारण देऊन ते धनादेश परत आले. त्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती.
अशाच प्रकारे अनेकांनी आपली कोट्यावधींची फसवणुक झाल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे केल्या आहेत. खिंससरा चव्हाण – 26 कोटी 70 लाख 37 हजार 973 रुपये आणि अशोक रायसोनी यांची 8 कोटी 38 लाख 30 हजार 756 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सतीश सेलोत यांची 1 कोटी 22 लाख 61 हजार 162 रुपये, दीपक लुंकड यांची 1 कोटी 59 लाख 32 हजार 818 रुपये, स्मीता देशपांडे यांची 27 लाख 87 हजार 822 रुपये, प्रकाशचंद बोरा यांची 2 कोटी 47 लाख 59 हजार 79 रुपये, भरत चेंगेडिया यांची 46 लाख 49 हजार 894 रुपये, गोकुळ बोथरा यांची 1 कोटी 20 लाख 62 हजार 934 रुपये अशा जवळपास 50 कोटी रुपयांच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल आहेत. अनेक तक्रारी या ऑक्टोबर, नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. तरीही आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास अतिशय संथगतीने सुरु आहे. अनेक तक्रारदारांना अजून गुन्हे शाखेन बोलवून त्यांचे म्हणणेही नोंदवून घेतले नाही, अशा या गुंतवणुकदारांच्या तक्रारी आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी या सर्व तक्रारींचे एकत्रिकरण करुन तपास करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले आहे.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत