टॉप पब्लिक न्यूज :
दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील सराईताकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त
पुणे - : दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील सराईताला पकडून खंडणी विरोधी पथकाने पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.
अविनाश अजय मिसाळ Avinash Ajay Misal (वय २४, रा. घोरपडी बाजार पोलीस चौकीमागे, घोरपडी) असे अटक आरोपींचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार ५०० रुपयांचा गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केला आहे.
खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार वानवडी पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार खरात व घावटे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शिंदे वस्ती येथील बंद असलेल्या कॅनॉलवरील रोडवर एक जण पिस्टल सह उभा आहे. या बातमीची खात्री करुन पोलीस पथकाने अविनाश मिसाळ याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळाले. वानवडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करुन पुढील तपासासाठी मिसाळ याला वानवडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दांडेकर पुल परिसरात ऑक्टोबर २०२२ मध्ये दोन गटांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी दोन्ही टोळक्यांनी एकमेकांवर कोयत्याने वार करुन परस्परांना जखमी केले होते. परिसरात लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोन्ही गटातील १६ जणांना अटक केली होती. त्यात अविनाश अजय मिसाळ याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यालाही अटक करण्यात आली होती.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.