नवी दिल्ली : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील अमित शहांना सदिच्छा दिल्या आहेत.
मात्र, सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत त्या म्हणजे खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शहांना दिलेल्या शुभेच्छा! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील अमित शहांना शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र त्या खोचकपणे! त्यांच्या या सदिच्छांमध्ये अमित शहांना देशातील महागाईवरुन टोले लगावण्यात आलेले आहेत. त्यामुळेच, त्यांच्या या सदिच्छा हटके आणि चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा! पेट्रोल-डिझेलच्या दरांप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्याची शंभरी पार करावी. खाद्यतेलांच्या दर ज्याप्रमाणे सातत्याने वाढत आहेत त्याप्रमाणेच तुमच्या कार्यकर्तुत्वाचा आलेख वाढता राहो.
पुढे त्यांनी म्हटलंय की, ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरचे भाव गतीने दुप्पट झाले आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील यश देखील दुप्पट होवो. आई जगदंबेच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की, सामान्य जनतेला महागाईच्या मारापासून वाचवण्याची क्षमता तसेच इच्छाशक्ती आपल्याला प्राप्त व्हावी. तुम्हाला वाढदिवासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...